नरेंद्र मोदी आज पुण्यात; पुरस्कार प्रदान सोहळ्याला शरद पवार उपस्थित राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार असून, त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमाला  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पंतप्रधानांच्या  हस्ते मेट्रोच्या नव्या मार्गिका सेवांचे उद्घाटन, पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पांचे लोकार्पण, नव्या गृहप्रकल्पांची पायाभरणी यासह विविध प्रकारच्या प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे.

पंतप्रधान मोदी मंगळवारी सकाळी 11 वाजता श्रीमंत  दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. सकाळी 11.45 वाजता पंतप्रधान मोदी यांना हिंद स्वराज ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

शाळांना सुट्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहराच्या मध्यभागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे डेक्कन एज्युकेशन, शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सोमवारी महिनाअखेरमुळे सकाळच्या सत्रातील शाळा लवकर सुटल्या. मात्र दुपारी भरणाऱ्या शाळांना सुट्टी देण्यात आली. दरम्यान, सुट्टीबाबत शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत आदेश काढण्यात आलेले नाहीत.