
सामना प्रतिनिधी । मुंबई
रस्त्याच्या कडेला पार्प केलेल्या महागडय़ा मोटरसायकल शिताफीने चोरून त्या बनावट नंबर प्लेट लावून विकणाऱया टोळीला क्राइम ब्रँच युनिट-७ ने जेरबंद केले. आरोपींकडून चोरीच्या १२ मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
शिवाजी, गोवंडी आदी परिसरात राहणाऱया तरुणांची टोळी शहरातील विविध भागातून मोटसायकल चोरून त्या विकत असल्याचे खबर युनिट-७ चे अंमलदार गुरव यांना मिळाली. त्याआधारे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीष श्रीधरकर, एपीआय महेश पाटणकर, संतोष मस्तुद, उपनिरीक्षक आनंद बागडे, संजय सुर्वे, अशोक चव्हाण, अमंलदार सावंत, सहाणे, कालुष्टे, हासे, काकडे आदींच्या पथकाने शिवाजीनगर परिसरात सापळा लावून रिजवान खान (२२), मुद्दसीर अहमद खान (२०), मैनुद्दीन शेख (१८), रिहान शेख (२१) अशा मोटरसायकल चोरांना पकडले. आरोपींकडून बुलेट, केटीएम, पल्सर, ऑक्टिव्हा अशा १२ महागडय़ा गाडय़ा पोलिसांनी हस्तगत केल्या. आरोपींनी घाटकोपर, नेहरूनगर, टिळकनगर, मानखुर्द, देवनार, कुर्ला, शीव, वडाळा, वाकोला, माटुंगा, खडवली या ठिकाणाहून मोटरसायकल चोऱया केल्याची कबुली म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोरायची, चालवायची मग विकायची
आरोपी मोटरसायकल चोरून मग मनसोक्त फिरवायचे. त्यानंतर नंबर प्लेट बदलून त्या विकायचे. तसेच मोटरसायकल विकणे शक्य झाले नाही तर स्पेअर पार्ट काढून विकायचे. त्यांनी कोणाकोणाला चोरीच्या मोटरसायकल विकल्या याचा पोलीस शोध घेत आहेत.




























































