दरोडा घालण्याच्या तयारी असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, राहुरी

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली श्रीरामपुर येथील सराईत दरोडेखोरांची टोळी राहुरीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी जेरबंद केली आहे. या टोळीकडून तलवार, सत्तूर, कोयता या धारदार शस्रा बरोबरच लाकडी दांडे, मिरची पूड व दरोड्यासाठी वापरण्यात आलेली इंडिका कार व मोटरसायकल जप्त केली आहे. राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ५ दरोडेखोरांना आज राहुरी न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या टोळीतील २ दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आसुन पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

नगर मनमाड राज्य मार्गावरील गुन्हेगारीचे केंद्रबिंदू ठरलेल्या राहुरी शिंगणापूर फाट्याजवळ सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राहुरी पोलीसांनी ही कारवाई केली. शिंगणापूर फाट्याजवळ दरोडेखोरांची टोळी असल्याची निनावी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर निवडक पोलीस पथका समवेत घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने दरोडेखोरांनी आपली वाहने जागेवर सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो अयशस्वी ठरला.

या कारवाईत सादिक बशीर शेख (नेवासा), संतोष सुरेश कांबळे , साबीर शब्बीर सय्यद, अन्वर लतिफ मन्सुरी, सागर सुरेश कांबळे या गुन्हेगारांच्या राहुरी पोलिसांनी मुसक्या आवळत दरोड्यासाठी वापरण्यात आलेली इंडिका कार क्रमांक एम.एच.०४ व्ही.एम.५४३६ तसेच मोटरसायकल एम. एच.१७ बी.क्यू.५१७० जप्त केली आहे.

या टोळीतील एकनाथ सोनवणे व बबलु शहा राहणार वार्ड नंबर २ श्रीरामपुर हे फरार झाले आहेत. जागतिक ख्याती असलेली धार्मिक स्थळे म्हणुन शिर्डी व शिंगणापूर या देवस्थानची ओळख आहे. नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरी हे देवस्थानकडे जाणारे मध्यवर्ती ठिकाण असल्याने भाविकांची लूट करण्यासाठी शिंगणापूर फाट्यावर दरोडेखोरांनी बस्तान बांधले आहे. महिन्याभरापूर्वी राहुरी शिंगणापूर या फाट्याजवळ शिर्डी येथील सराईत गुन्हेगार सरोदे टोळीला पकडण्यात आले होते. या पाठोपाठ श्रीरामपुर येथील दरोडेखोरांची टोळी पकडण्यात आल्याने राहुरी शिंगणापूर फाटा गुन्हेगारीचे केंद्र बिंदू ठरला आहे. गेल्या ३ वर्षांपासून रस्तालुटीच्या अनेक घटना शिंगणापूर फाट्याच्या परिसरात घडल्या आहेत.