मिंधे सरकारचा पोलिसी अत्याचार; कर्जमुक्तीसाठी मंत्रालयाकडे निघालेल्या हिंगोलीतील शेतकऱयांना रस्त्यातच उचलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाने दडी मारल्याने मराठवाडय़ातील शेतकऱयांची पिके उद्ध्वस्त झाली. पीक कर्ज फेडायला पैसे नसल्याने त्यांनी स्वतःचे अवयव विक्रीला काढले आहेत. परंतु या गरीब शेतकऱयांचा मिंधे सरकारला कळवळा येत नाही. सरकारकडून त्यांच्यावर पोलिसी अत्याचार केले जात आहेत. आज आपली गाऱहाणी घेऊन शिवसेना नेत्यांबरोबर मंत्रालयात जात असलेल्या शेतकऱयांना मिंध्यांच्या पोलिसांनी रस्त्यातच उचलले आणि थेट पोलीस कोठडीत नेऊन डांबले.

मिंधे सरकार आपली दखल घेत नाही म्हणून हिंगोली, वाशीममधील शेतकरी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर पोहोचले होते. तिथे त्यांची शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांच्याशी भेट झाली.
‘शेतकऱयांनी आपल्याला उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी एक निवेदन दिले. पीक कर्ज फेडण्यासाठी सरकारकडून आर्थिक आधार मिळावा अशी शेतकऱयांची मागणी आहे. त्यासंदर्भात आपण संबंधित मंत्र्यांशी भेट घालून देऊ असे शेतकऱयांना सांगितले आणि त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी पोहोचण्यास सांगितले. तिथून मी आणि माजी मंत्री संजय देशमुख शेतकऱयांना घेऊन वित्तमंत्री अजित पवार तसेच मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याकडे जाणार होतो. शेतकऱयांशी चर्चा केल्यानंतर आम्ही शिवसेना भवन येथे गेलो. पण नंतर समजले की, त्या शेतकऱयांना ‘मातोश्री’ बाहेर पडताच कलानगरच्या मुख्य प्रवेशद्वारावरच पोलिसांनी पकडून गाडीत कोंबले. तिथून त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात आले,’ अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱयांमध्ये हिंगोलीचे गजानन कावरखे, रामेश्वर कावरखे, नामदेव पतंगे, संजय मुळे, वाशिमचे बालाजी मोरे यांचा समावेश आहे. जबरदस्ती पकडून गाडीत कोंबण्याचा प्रयत्न करणाऱया पोलिसांना ‘आमचा गुन्हा काय?’ असे शेतकरी विचारत होते. परंतु पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत कोंबले आणि आधी वांद्रे नंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले.