धारावी मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली, शिवसेनेच्या भूमिकेकडे साऱ्याचं लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली ‘अदानी’च्या घशात घालण्याचा डाव ‘मिंधे’ सरकारने आखला आहे. या पुनर्विकासात धारावीकरांवर प्रचंड अन्याय झाल्यामुळे आतापर्यंत अनेक आंदोलनेही करण्यात आली. मात्र धारावीकरांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न सरकार आणि ‘अदानी’कडून सुरू आहेत. याचा तीव्र निषेध करीत धारावीकरांच्या हक्कांसाठी 16 डिसेंबर रोजी शिवसेनेचा मोर्चा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘अदानी’च्या ‘बीकेसी’तील कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चाला तातडीने परवानगी द्यावी यासाठी शिवसेनेकडून धारावी पोलीस ठाण्याकडे अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र धारावी पोलीस ठाण्याने हा अर्ज फेटाळत परवानगी नाकारली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

‘धारावी बचाव आंदोलन’ मोर्चासाठी परवानगी द्यावी यासाठी माजी आमदार बाबूराव माने, विधानसभा संघटक विठ्ठल पवार यांच्या वतीने धारावी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांच्याकडे पत्र सादर करण्यात आले होते. मात्र गुरुवारी धारावी पोलिसांनी परवानगी नाकारली. त्याचवेळी मोर्चासाठी मुंबई पोलिसांकडे आयुक्तांकडे अर्ज करण्यास स्थानिक नेत्यांना पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.