
मालदीवच्या माफुशी बेटावर सुरू असलेल्या 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनाच्या पहिल्या दिवशी हिंदुस्थानी खेळाडू आणि पाऊस दोघेही बरसले. त्यात हिंदुस्थानच्या खेळाडूंनी चार सुवर्ण पदकांची जबरदस्त कमाई केल्यामुळे मालदीवमध्ये अर्ध्या अर्ध्या तासाच्या फरकाने ‘जन गण मन’चे सूर घुमले. नवी मुंबईच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर सुभाष पुजारी यांनी अभिमानास्पद कामगिरी करताना मास्टर्स शरीरसौष्ठवाच्या गटात ‘आशिया श्री’चा बहुमान पटकावून इतिहास रचला. तसेच दिव्यांगांच्या गटात के. सुरेश, ज्युनियर गटात (75 किलो) सुरेश बालाकुमार, स्पोर्टस् फिजीक प्रकारात अथुल कृष्णा यांनी सोनेरी यश मिळवले.



























































