
सामना ऑनलाईन, मुंबई
रिक्षात विसरलेली बॅग अवघ्या सहा तासांतच शोधून काढण्याची कामगिरी गोरेगाव पोलिसांनी केली. सीसीटीव्हीमध्ये दिसलेला रिक्षाचा पुसट नंबर, शर्टचा कलरवरून तपास करत रिक्षात विसरलेली ती बॅग पोलिसांनी शोधून काढली.
गोरेगाव येथे राहणारे देवांग देसाई हे 31 डिसेंबरला कामानिमित्त बोरिवली येथून रिक्षाने अंधेरीला जात होते. दुपारी रिक्षा गोरेगावच्या एस.व्ही. रोड येथे आली. अचानक रिक्षा बंद पडल्यामुळे देसाई यांनी दुसरी रिक्षा पकडली. दुसऱ्या रिक्षाने काही अंतर गेल्यावर देसाई यांना बॅग नसल्याचे लक्षात आले. देसाई यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक संजीव भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर मुजावर, पोलीस हवालदार रमेश जाधव, पोलीस नाईक साबीर शेख, पोलीस शिपाई सचिन कांबळे, बबन लोणारे, पंकज ढोक यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यात रिक्षाचा नंबर दिसला. दुपारच्या वेळेस वर्दळ असल्याने अनेक रिक्षा तेथून जात होत्या. तेव्हा पोलिसांनी देसाई यांना रिक्षात कसे बसले होते, याबाबत विचारणा केली. देसाई यांनी त्या दिवशी घातलेले शर्ट हे सीसीटीव्हीमध्ये दिसले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांना रिक्षाचा नंबर मिळाला. नंबर मिळाल्यावर पोलीस त्या रिक्षाचालकापर्यंत पोहचले.



























































