
पोलिसांच्या कामात आधुनिकतेबरोबरच व्यावसायिकपणा आणण्यावर भर देणार असल्याची माहिती सोलापूरचे नूतन पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी दिली.
पदभार घेतल्यानंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जाधव व पोलीस निरीक्षक भोसले उपस्थित होते.
शिरीषकुमार सरदेशपांडे म्हणाले, ‘पोलिसांची कार्यपद्धती जनताभिमुख असेल, त्याचबरोबर आधुनिकतेची जोड देत कामात व्यावसायिकपणा आणण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. सोलापुरात पंढरपूर, अक्कलकोटसह अनेक तीर्थक्षेत्र असून, राज्याबरोबरच परराज्यातून भाविक व पर्यटकांची अधिक वर्दळ असते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेबरोबरच भाविकांना व पर्यटकांना त्रास होऊ नये, याची खबरदारी पोलीस घेतील.
सध्या ग्रामीण भागातील अवैध व्यवसायावर लक्ष असून, चांगले उपक्रम यापुढेही चालू राहतील. सायबर गुह्यांचे प्रमाण वाढत आहे, त्यादृष्टीने पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचारी गुह्यांच्या प्रकरणामध्ये व्यस्त असून, शासनाकडे रिक्त पदे भरण्यासंबंधी पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.





























































