सात दहशतवाद्यांनी केला ग्रेनेडने हल्ला, जखमी जवानाने दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूंछमध्ये गुरुवारी दुपारी लष्कराच्या ट्रकवर सात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. पाऊस आणि दाट धुक्याच्या आड दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात वाहनाने पेट घेतला आणि त्यात राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान शहीद झाले. या हल्ल्यात जखमी जवानाने लष्कराला ही माहिती दिली. दरम्यान, लष्कराने गुरुवारी संध्याकाळपासूनच ड्रोन आणि स्निफर डॉगच्या सहाय्याने जंगलात पळून गेलेल्या दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम राबवली आहे.

कश्मीरमधील पूंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर गुरुवारी झालेल्या हल्ल्याचा अधिक सखोल तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि आठ सदस्यांचे न्यायवैद्यक पथक पूंछला रवाना झाले आहे. बॉम्बनाशक पथक व स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) पथकाने सकाळपासूनच बाटा-डोरिया परिसरात तपास सुरू केला आहे. तपासात घटनास्थळावरून चिनी बनावटीचे एक रिकामे काडतूस सापडले आहे. या हल्ल्यात पंजाबचे चार जवान तर ओडिशातील एक जवान शहीद झाला होता. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची एक शाखा असलेल्या पीपल्स ऍण्टी फॅफिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.