कोरोनामुक्त झाल्यानंतर निरोगी राहण्यासाठी ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष…

कोरोनामुक्त झाल्यानंतर शरीरात अॅण्टीबॉडी तयार होत असल्याने पुन्हा कोरोनाचे संक्रमण होण्यापासून बचाव होतो. शरीरात कोरोनाविरोधातील अॅण्टीबॉडी कधीपर्यंत राहतात आणि पुन्हा संक्रमण होण्यापासून किती काळ बचाव होतो, याबाबत संशोधकांमध्ये मतभेद आहेत. याबाबत अधिक संशोधन सुरू आहे. मात्र, कोरोनामुक्त झाल्यानंतरही पुन्हा कोरोनाचे संक्रमण झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. पुन्हा कोरोनाचे संक्रमण होणाऱ्यांमध्ये वृद्ध किंवा निष्काळजीपणा करणाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते.

मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर आणि हात धुणे या गोष्टी सर्वांसाठी आवश्यक आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि कोरोनामुक्त झाल्यानंतर दिलेले औषधोपचार डॉक्टरांच्या सल्लाप्रमाणे सुरू ठेवावे. उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास असल्यास त्याची नियमित तपासणी करावी. तसेच कोरोनामुक्त झाल्यानंतर नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. कोरोनाबाधित झाल्याने शरीरात अशक्तपणा आलेला असतो. त्यामुळे व्यायाम करण्यास त्रास होतो. मात्र, दररोज थोडावेळ तरी व्यायाम करावा. दररोज व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसीकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यास मदत होते. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे सकस आणि पौष्टिक आहाराकडे लक्ष द्यावे. त्यामुळे प्रकृती सुधारण्यास मदत होते. कोरोनाबाधित झाल्याने खाण्याची इच्छा कमी होते. वजन कमी होऊन अशक्तपणा आलेला असतो. त्यामुळे आहारात सकस आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.

कोरोना व्हासरस मेंदू आणि स्मरणशक्तीवरही परिणाम करत असल्याने स्मरणशक्ती वाढवण्यासाठी शब्दकोडे, सूडोकू, बुद्धीबळ खेळावे. तसेच स्मरणशक्तीला चालना मिळेल अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे. साध्या साध्या गोष्टींपासून सुरुवात करून त्याचा वेळ वाढवत न्यावा. कोरोनामुक्त झाल्यानंतर लगेचच नेहमीच्या दिनचर्येला सुरुवात करू नये. कोरोना व्हायरस रोगप्रतिकारशक्तीवर हल्ला चढवत असल्याने शरीरात अशक्तपणा आलेला असतो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने दिनचर्येला सुरुवात करावी. सर्व कामे एकाचवेळी सुरू करू नये. प्रवासाची दगदग टाळावी. काम सुरू करताना शरीरावर आणि मनावर ताण येणार नाही,याची काळजी घ्यावी.

कोरोनामुक्त झाल्यानंतरही अनेकांना इतर आजाराचे संक्रमण किंवा आरोग्याबाबतच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यावर कोणताही त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ल्याने आरोग्य तपासणी आणि आवश्यक त्या चाचण्या कराव्यात. कोरोनामुक्त झाल्यानंतर दिनचर्या सुरळीत होण्यासाठी काही काळ जाणे गरजेचे असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची घाई करू नये. तसेच गरज भासल्यास कुटुंबिय किंवा मित्रांची मदत घ्यावी. इतरांची मदत घेतल्याने आराम वाटेल आणि नात्यातील दुरावा वाढणार नाही. तसेच आजारापणामुळे आलेला एकटेपणा दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतर निरोगी राहण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या