My फिटनेस Funda : मन+शरीर=आरोग्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> भक्ती आम्रे, पॉवरलिफ्टर

फिटनेस म्हणजे? : शरीर आणि मन दोन्ही निरोगी असणं .

पॉवरलिफ्टिंग की आरोग्य? : आरोग्य. ते चांगले असेल तर पॉवरलिफ्टिंग होऊ शकते. दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे.

डाएट की जीवनशैली? : जीवनशैली. कारण ती जर सुरळीत असेल ना तरच डाएट होऊ शकतो. कारण आपली उठण्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक क्रिया ठरलेली असेल तरच तुमचं दोन्ही नीट राहील.

सामान्य माणसासाठी फिटनेस? : सर्वसामान्यांनी व्यायामशाळेत जाऊनच व्यायाम करायला हवा असे नाही, पण किमान दिवसातला अर्धा तास चालण्यासाठी दिला तरी पुरेसा आहे.

व्यायाम कसा करावा? : व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. व्यायामशाळेतील व्यायाम आहे, योगा आहे. ज्यांना ज्या पद्धतीने करता येतो त्या पद्धतीने व्यायाम करायला हवा. काही लोकांना शारीरिक व्याधी असतात, त्यांनी योगा करावा. जे शारीरिकरीत्या सक्षम आहेत त्यांनी व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करावा. ज्यांना दोन्ही ठिकाणी सुसंगती ठेवता येत नाही त्यांनी किमान चालायला तरी जावे.

व्यायाम आणि डाएट समतोल कसा राखता? : बर्‍याचदा व्यायाम चांगला करतात, पण डाएटकडे दुर्लक्ष केले जाते. व्यायामाला डाएटही तेवढेच असणे आवश्यक आहे. दररोज उपाशी रहा असे नाही, पण प्रमाणातच सगळ्या गोष्टीं खाल्ल्या पाहिजेत. आठवड्यातून एक दिवस तेलाचा थेंबही पोटात जायला नको याची काळजी घ्या. त्याने फरक पडतो. तेलापेक्षा तूप किंवा खोबरेल तेलाचा आहारात वापर करा.

दिवसातून पाणी किती प्यावे? : खेळाडूने चार ते पाच लिटरआणि सर्वसाधारण लोकांनी अडीच ते तीन लिटर.

जिमला जायला न मिळाल्यास? : ज्या दिवशी वर्कआऊटसाठी वेळ मिळत नाही त्या दिवशी चालायला जाते, धावते, योगा करते.

बाहेर गेल्यावर डाएट कसा सांभाळता? : शक्यतो मी सगळे डाएटचे खाणे बाहेर जाताना सोबत घेते.

कोणता पदार्थ नियमित खाता? : फळं, दूध, चिकन, अंडी.

फिटनेससाठी कोणत्या गोष्टीचा त्याग केलास? : भात मला खूप आवडतो, पण नाही खाता येत.

फिटनेस मंत्र : मन आणि शरीर या दोघांचा ताळमेळ चांगला ठेवला तर कायम फिटनेस चांगला राहू शकतो. आयुष्यात आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत असतो. त्यात काही चांगल्या असतात तर काही वाईट असतात. अशा वेळेला शरीर आणि मनाचा, दोन्हीचा समतोल ठेवणे आवश्यक आहे. तरच तुमचा फिटनेस चांगला राहील.