देवबाभळी… सावलीमध्ये थांबलेल्यांची गोष्ट, प्राजक्त देशमुखने उलगडले मर्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाटय़ लेखक प्राजक्त देशमुख यांना ‘देवबाभळी’ पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार गुरुवारी जाहीर झाला. प्राजक्तवर साहित्य-नाटय़ वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘देवबाभळी’ने भरभरून दिल्याचं प्राजक्त सांगतो. ‘देवबाभळी’ म्हणजे सावलीमध्ये थांबलेल्यांची गोष्ट आहे. तिच्या संहितेची ताकद मराठी संस्कृतीत असल्याच्या भावना प्राजक्तने व्यक्त केल्या.

साहित्य किंवा वाङ्मय म्हणून ‘देवबाभळी’च्या नाटय़ संहितेला गौरवण्यात आले आहे. संहितेचा सशक्तपणा सांगताना प्राजक्त म्हणाला, एकदा नाटकाचा प्रयोग बघितल्यावर भालचंद्र नेमाडे सर म्हणाले होते, मागे जाणंसुद्धा पुढे जाणं असतं. 17 व्या शतकातील तुकाराम जर आपण नव्याने परत शोधू पाहतोय, नव्याने मांडू पाहतोय, तर हे जे काळाच्या मागे जाणं आहे, त्याच्यामध्ये पुढे जाण्याची उत्तरं असतात. तुकारामांची गाथा, त्यांची संपूर्ण शिकवण आणि आवली -रखमाई या दोघींचे जगणं, हा सगळा जो आपला सांस्कृतिक पट आहे, या मराठी संस्कृतीमध्ये ‘देवबाभळी’च्या संहितेचा सशक्तपणा आहे. याशिवाय पूर्वीच्या काळी जी संगीत नाटके व्हायची, त्या वाटेने न जाता स्वतंत्र पद्धतीने संगीत नाटक करायचा प्रयत्न केला हे त्याच्यातील बलस्थान आहे.

प्राजक्त पुढे म्हणाला, जेव्हा तुकाराम तासन्तास अभंग लिहीत होते आणि पांडुरंग भक्तांसाठी वेळ काढत होते, त्यावेळी त्यांचा संसार कसा चालत होता. त्यांच्यापाठी कुणीतरी होतं ते सगळं सांभाळणार. त्यांच्या काय व्यथा आहेत. प्रत्येक मोठय़ा आकृतीच्या मागे खूप मोठी सावली असते. त्या सावलीत कुणीतरी थांबलेलं असतं. त्या सावलीमध्ये थांबलेल्याची गोष्ट म्हणजे ‘देवबाभळी.’

काटा रुते कुणाला…

‘देवबाभळी’ची जखम नेमकी कुणाची यावर प्राजक्त सांगतो, आवली-रखमाईची आपापल्या संसाराची तक्रार आहे, पण दोघीही त्यांच्या वेदनेला आपापल्या पद्धतीने सामोऱया जात आहेत. त्यांच्यात सहवेदना आहे. इथे आवली जिंकली की रखुमाई हा विषय नाही. त्या दोघींत सहवेदना आहे. दोघीजणी एकप्रकारे आपल्या नवऱयावर रुसलेल्या असल्या तरी दोघी कशा पद्धतीने परिस्थितीला तोंड देत आहेत, त्यांचे काय म्हणणे आहे? त्यांचा हरवलेले स्वत्व जपण्यासाठीचा लढा, आपलं प्रेम आणि पतीबरोबर सलोखा साधण्याचा, संसाराचा गाडा चालवण्याचा दोघींचा प्रयत्न दाखवणे मला गरजेचे वाटले.

स्त्राrची स्वतंत्र ओळख महत्त्वाची

मुळातच रखुमाई आणि आवली. त्यांची नावं घेतल्यावर पहिली ओळख म्हणजे एक विठ्ठलाची बायको, तर दुसरी तुकारामांची बायको. कुणाची तरी पत्नी असणे ही ओळख नव्हे. एखाद्या व्यक्तीची ओळख अमुक एका नात्याने होऊ शकत नाही. प्रत्येकाची स्वतंत्र ओळख असते हा विचार माझ्या डोक्यात होता. माझ्या घरी वारकरी परंपरा आहे. पांडुरंगाने काटा काढला वगैरे ही आख्यायिका मला ठाऊक होती. आपल्याला माहीत आहे की, रखुमाई विठ्ठलावर रुसलेली आहे. आपण त्यांच्यातील देवत्व जर बाजूला ठेवून बघितलं… एखाद्या बाईला जर कळलं की, आपल्या नवऱयाने तिसऱयाच बाईचा पाय हातात घेऊन काटा वगैरे काढला, तर ती आधीच रुसलेली आहे, त्यात तिची स्वाभाविक ‘रिअॅक्शन’ काय असेल? हा चौकोन मला दिसला. तुकाराम, पांडुरंग आणि दोन्ही बायका… मग जे घडत गेलं ते टिपणे एवढंच होतं. नाटय़ त्याच्यामध्ये होतंच, असे प्राजक्तने सांगितले.