
भाजपसोबत आम्ही कदापि जाणार नाही. तसेच भाजपसोबत जे असतील त्यांच्याबरोबरही आमची युती होऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मांडली.
आमचे काही ऐतिहासिक मुद्दे आहेत. वैदिक हिंदू समाज रचनेबाबत आमचे भाजपशी भांडण आहे. त्यावर त्यांनी आधी उत्तर दिले पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. भाजपसोबत कोणी जात असेल तर आम्ही त्यांच्यासोबतही जाणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजगृह येथे झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महाविकास आघाडीचे अजून काही ठरलेले नाही. त्यांचे जोपर्यंत काही ठरत नाही तोपर्यंत आमची त्यांच्यासोबतही युती होऊ शकत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय राहत नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
शिवसेनेचे काही नेते मला भेटून गेले. पण 20 तारखेच्या कार्यक्रमानिमित्त भेटून गेले. त्यात राजकीय चर्चा नव्हती. प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जवळचा संबंध होता. त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला हजर राहणार आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.




























































