
हिंदुस्थानची अर्थव्यवस्था दारुड्यासारखी झाली आहे. दारुड्या जसं एक-एक साहित्य विकतो तसाच देशाचा कारभार सुरु आहे. पंतप्रधानांना मी दारुडा म्हणत नाही. पण त्यांची वागणूक दारुड्यासारखी आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अकोल्यात भारतीय बौद्ध महासभेच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अकोला क्रिकेट क्लबवरील मैदानावर हा कार्यक्रम झाला. पाऊस असतानाही लोकांनी सभेला गर्दी केली होती.
दाडू इंदुरीकरांचे ‘गाढवाचं लग्न’ हे नाटक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिल्यानंतर त्यांचा मोठेपणा दिसून आला होता. राजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा जसा बाळासाहेब ठाकरेंमध्ये होता, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये नाही, अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली. देवेंद्र फडणवीसांचे डिमोशन झालं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. ग्रामपंचायत निवडणुका वंचित बहुजन आघाडी लढणार आहे, अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. कार्यकर्त्यांनी या निवडणुका ताकदीने लढवायच्या, असं आवाहनही त्यांनी केलं.






























































