
हिंदुस्थानच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा गगनयान मोहिमेतील चार अंतराळवीरांच्या नावाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी केली. या मोहिमे अंतर्गत सुमारे सहा टन वजनाचे यान अवकाशात पाठवण्यात येणार आहे. प्रशांत बाळकृष्ण नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि विंग कमांडर सुभांशू शुक्ला अशी अंतराळवीरांची नावे आहेत. केरळमधील विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्राला मोदी यांनी भेट दिली. या दौऱयात त्यांनी चार अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
चौघेही हिंदुस्थानी हवाई दलाचे अधिकारी आहेत. बंगळुरू येथे या अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी खास सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर रशियामध्येही या चार जणांना प्रशिक्षण देण्यात आहे. दरम्यान, 2025च्या अखेरीस किंवा 2026च्या सुरुवातीला चारही अंतराळवीर गगनयान मोहिमेअंतर्गत अवकाश भ्रमंती करणार आहेत.
स्वबळावर अवकाळात अंतराळवीर पाठवणारा हिंदुस्थान हा रशिया, अमेरिका आणि चीननंतरचा चौथा देश ठरणार आहे. बलाढय़ युरोपियन अंतराळ संस्था, जपान आणि कॅनडालाही हे अद्यापी शक्य झालेले नाही.
गगनयान मोहिमेवर एकूण नव्वद अब्ज रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 2035पर्यंत हिंदुस्थान पहिले अंतराळ स्टेशन उभारणार असून 2040पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे लक्ष्य आहे.
या वेळी वेळ, काऊंटडाऊन आणि रॉकेटही आपलेच
तब्बल चाळीस वर्षांनी हिंदुस्थानी अंतराळवीर अंतराळात संशोधन करणार असून 140 कोटी हिंदुस्थानींच्या अपेक्षा पूर्ण करणार आहेत. या वेळी वेळ, काऊंटडाऊन आणि रॉकेटही आपलेच असेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळवीरांना शुभेच्छा दिल्या. यानासाठीचे जास्तीत जास्त भाग हे हिंदुस्थानचे आहेत. याबद्दल आपल्याला अभिमान असल्याचे पंतप्रधान या वेळी म्हणाले.



























































