मोदी सरकारचा ‘मुंबई हाय’चे खासगीकरण करण्याचा घाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने सार्वजनिक मालमत्तांच्या खासगीकरणाचा आणि चलनीकरणाचा सपाटा लावलेला असतानाच आता ओएनजीसीच्या नियंत्रणात असलेल्या ‘मुंबई हाय’ या खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन घेणाऱया तेल क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यानुसार ओएनजीसीने मुंबई हायमधील 60 टक्के हिस्सा आणि नियंत्रणाचे अधिकार परदेशी कंपनीकडे सुपूर्द करावेत असे निर्देश सरकारने दिले आहेत.

मुंबईपासून अरबी समुद्रात 176 किलोमीटर आत मुंबई हाय हे नैसर्गिक तेल क्षेत्र आहे. या तेल क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा केंद्राने विचार केला असून त्याबाबत पेट्रोलियम मंत्रालयातील अतिरिक्त सचिव अमरनाथ यांनी ओएनजीसीचे अध्यक्ष सुभाष कुमार यांना पत्र दिले आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाकडून तिसऱयांदा खासगीकरणासाठी प्रयत्न

मुंबई हाय आणि वसई सॅटेलाइटमधील तेल उत्पादन क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे येथे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना अमंत्रित करायला हवे, असे अमरनाथ यांनी म्हटले आहे. दरम्यान, ओएनजीसीने स्वतःकडील तेल विहिरी आणि तेल क्षेत्रांचे खसगीकरण करावे यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने तिसऱयांदा प्रयत्न केला आहे. ओएनजीसीकडून उत्पादन होणाऱया खनिज तेल आणि नैसर्गिक वायूमध्ये मुंबई हायचे मोठे योगदान आहे. याचे खासगीकरण झाल्यास ओएनजीसीकडे छोटय़ा तेल विहिरी आणि काही मोजके तेलसाठे शिल्लक राहणार आहेत.