प्रेरणादायी कुलगुरू पुरस्कार डॉ. सुधीर गव्हाणे यांना जाहीर

महाराष्ट्रातील नामांकित ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व महात्मा गांधी मिशनच्या एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांना यावर्षीचा ‘सर्वाधिक प्रेरणादायी कुलगुरू 2020’ (मोस्ट इन्स्पायरिंग व्हाइस चान्सलर) हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित झाला आहे. 20 ऑक्टोबर रोजी डिजिटल पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

भारतीय स्तरावरील हा पुरस्कार ‘गोल्डन एम़ अँवार्ड फ़ॉर एक्सलन्स अँड लीडरशिप इन एज्युकेशन संस्थे’द्वारे दरवर्षी दिला जातो. उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी, शिक्षकांना लेखन, प्रभावी व्याख्याने व प्रत्यक्ष काम याद्वारे प्रेरणा देण्याचं व नवनव्या कल्पना सातत्याने राबविण्याचे लक्षणीय सकारात्मक कार्य करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ उच्च शिक्षण कारकीर्दीत बहुविषयातील नवनव्या अभ्यासक्रमांची आखणी तसेच नव्या विभागांची स्थापना, अकॅडमिक स्टाफ़ कॉलेजमध्ये प्राध्यापकांसाठी शेकडो तसेच विद्यार्थी वर्गासाठी दोन हजारांहून अधिक प्रेरक व्याख्याने दिली आहेत. त्यांनी आजवर दोन हजारांहून अधिक विविध विषयांना स्पर्श करणारे लेख लिहिले आहेत. कुलगुरू या नात्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नियोजन व विकासात अनेक उपक्रम राबविले आहेत. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव क़दम यांच्या सकारात्मक दृष्टीने व पाठबळाने हे कार्य करता आल्याचे प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या