‘कसाब’ म्हटल्याने विद्यार्थी संतापला, प्राध्यापकाला केले निलंबित

मुस्लिम तरुणाला ‘कसाब’ म्हणणाऱ्या प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार कर्नाटकातील मणिपाल विश्वविद्यालयात घडला आहे. सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये हा विद्यार्थी त्याला कसाब म्हटल्याने संतप्त होऊन प्राध्यापकांसमोर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. सदर प्रकार शुक्रवारी घडल्याचे कळते आहे. या प्राध्यापकाने विद्यार्थ्याला त्याचे नाव विचारले होते. तरुण मुसलमान असल्याचे कळाल्यानंतर या प्राध्यापकाने ‘अच्छा तू कसाबसारखा आहेस’ असं म्हटलं होतं. हे ऐकल्यानंतर त्या विद्यार्थ्याला राग आला आणि त्याने प्राध्यापकांसमोरच आपली नाराजी व्यक्त केली. आपण मुसलमान असल्याने आपल्याला अशा पद्धतीने हिणवणं हे चूक असल्याचं या विद्यार्थ्याने त्याच्या प्राध्यापकांना सांगितलं.

या विद्यार्थ्याने आपली नाराजी व्यक्त करताना म्हटले की, “26/11 ला देशावर झालेला हल्ला हा जोक नव्हता. या देशात मुसलमान असल्याने आम्हाला रोज अशा गोष्टींचा मुकाबला करावा लागतो. तुम्ही माझ्या धर्माची अशा पद्धतीने खिल्ली उडवू शकत नाही. तुम्ही मला इतक्या सगळ्या लोकांसमोर अशा पद्धतीने कसं काय बोलावू शकता. ते देखील वर्गामध्ये…तुम्ही एक प्राध्यापक आहात आणि तुम्ही शिकवत आहात ना ?” विद्यार्थी आक्रमक झालेला पाहून प्राध्यापकाने त्याला सॉरी म्हटलं, मात्र यावर तो विद्यार्थी म्हणाला की सॉरी म्हटल्याने तुम्ही कसा विचार करता आणि तुम्ही तुमचे चित्रण विद्यार्थ्यांसमोर कसे करता हे बदलणार नाहीये. यावर या प्राध्यापकाने त्या विद्यार्थ्याला तू माझ्या मुलासारखा आहेस, असं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यावर त्या विद्यार्थ्याने प्राध्यापकाला उटला प्रश्न विचारला की, तू तुझ्या मुलाला दहशतवाद्याच्या नावाने बोलावशील का ? हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मणिपाल विश्वविद्यालयाने प्राध्यापकाविरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिले असून त्याला निलंबित करण्यात आले आहे.