निकृष्ट बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करा, कर्जत नगरपालिकेसमोर ठिय्या

49

सामना प्रतिनिधी । कर्जत

निकृष्ट बांधकामामुळे इमारतीचा काही भाग कोसळताच नगर परिषदेने तत्काळ ‘हिल ह्यू’ला धोकादायक ठरवून पाणी आणि वीज तोडली. मात्र हे करत असताना बिल्डर व आर्किटेक्टवर कोणतीही कारवाई न करता पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ऐन थंडीत येथील रहिवाशांना उघडय़ावर राहण्याची वेळ आली असून याविरोधात आज नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

कर्जत शहरातील कचेरी रोड भागात हिल ह्यू ही इमारत असून 14 डिसेंबर रोजी या इमारतीचा काही भाग कोसळला होता. यानंतर कर्जत नगर परिषद प्रशासनाने इमारतीमध्ये राहणाऱया सदनिकाधारक यांचे म्हणणे ऐकून न घेता इमारतीचे पाणी तोडून टाकले आणि वीजपुरवठा बंद केला. त्याचवेळी इमारत धोकादायक असल्याचे पत्र धाडले. मात्र इमारत बांधणाऱया बिल्डर आणि आर्किटेक्टवर कोणतीही कारवाई केली जात नाही.

तेव्हापासून इमारतीमध्ये राहणारे नागरिक पालिकेविरुद्ध आंदोलने करीत आहेत. आजही पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी सदनिकाधारकांनी बिल्डर कमलेश ओसवाल, जितेंद्र ओसवाल व इमारतीचे आर्किटेक्ट अभिनव जोगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या