
मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात मराठीसह विविध भाषिक चित्रपटांच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान असलेल्या ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वाचविण्यासाठी गेल्या 250 दिवसांपासून रंगकर्मींचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र, राज्य शासनाने आजवर या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलक रंगकर्मींनी अखेर आज टोकाचे पाऊल उचलत स्टुडिओसमोरच सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना रोखताना पोलिसांशी मोठी झटापट झाली होती. दरम्यान, यापुढे मंत्रालयात घुसून आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला.
ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओची जागा यापूर्वी काही बिल्डरांच्या घशात घालून येथे रहिवासी व वाणिज्यिक इमारती बांधण्यात आल्या आहेत. याविरोधात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून कलाकारांसह कोल्हापूरकरांकडून अनेक आंदोलने करण्यात आली. त्यानंतरही कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असतानाही काही वादग्रस्त बिल्डर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मुलांचा सहभाग असलेल्या श्री महालक्ष्मी स्टुडिओकडून या स्टुडिओची उरलीसुरली जागा व हेरिटेजमधील इमारत गुपचूप विकत घेतल्याचे प्रकरण चव्हाटय़ावर आले. त्यामुळे सर्व स्तरांतून त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तत्काळ खुला करा, स्टुडिओतील इमारतीमधील खुली जागा आरक्षित राहावी, चित्रीकरण सोडून कोणताही अन्य व्यावसायिक वापर होऊ नये, स्टुडिओ व्यावसायिक, तसेच वाणिज्यिक वापरासाठी देऊ नये, स्टुडिओच्या जतनासाठी राज्य शासन आणि मनपाने लक्ष घालावे आदी मागण्यांसाठी गेल्या 250 दिवसांपासून या स्टुडिओसमोरच येथील रंगकर्मींकडून ‘जयप्रभा स्टुडिओ बचाओ’ आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात अनेक लोकप्रतिनिधी, तसेच मंत्र्यांना निवेदने देण्यात आली आहेत.
आंदोलनात सहभाग घेणाऱया क्षीरसागरपुत्रांनीच स्टुडिओ विकला!
n आता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या ऋतुराज व पुष्कराज या दोन्ही मुलांसह काही वादग्रस्त बिल्डरांचा समावेश असलेल्या आणि नव्यानेच सुरू केलेल्या ‘श्री महालक्ष्मी स्टुडिओ’कडून ही जागा वटमुख्यत्यार तयार करून विकल्याचे दाखविण्यात आले. ज्यांनी या स्टुडिओ वाचविण्यासाठी आंदोलनात सहभाग घेतला, त्याच राजेश क्षीरसागर यांच्या मुलांच्या सहभागाने लॉकडाऊनच्या काळात पद्धतशीर व गुपचूपपणे हेरिटेजमध्ये समावेश असणाऱया या स्टुडिओसह उर्वरित जागा बळकाविण्याचा प्रयत्न केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
जयप्रभा स्टुडिओचा इतिहास
n लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजाश्रयामुळे करवीरनगरीतील कला-क्रीडा बहरली. हीच परंपरा पुढे त्यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनीही चालविली. त्यातूनच चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाच्या सुरुवातीच्या टप्प्यात छत्रपती राजाराम महाराज यांनी चित्रपटसृष्टीसह येथील विकासाचा उद्देश ठेवून 1 ऑक्टोबर 1933मध्ये ‘कोल्हापूर सिनेटोन’ सुरू केले. मेजर दादासाहेब निंबाळकर यांनी आपल्या कामकाजानंतर हा स्टुडिओ चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्याकडे कराराने दिला. पुढे कर्जबाजारीपणामुळे भालजी पेंढारकर यांनी हा स्टुडिओ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना विकला. त्यानंतर या स्टुडिओमधून चित्रपटांची निर्मिती होण्याऐवजी हा स्टुडिओ सांभाळण्याचा खर्च परवडत नसल्याने 10-12 वर्षांपूर्वी स्टुडिओची जागा काही खासगी बिल्डरांना विकण्यात आली. यावरून लता मंगेशकर विरुद्ध कोल्हापूरकर असा संघर्ष निर्माण झाला होता.































































