गद्दारांविरोधात जनतेत चीड; मावळमध्ये मशालच पेटणार

शिवसेनेबरोबर गद्दारी करून मिंध्यांबरोबर गेलेल्या उमेदवारांविरोधात मतदारांमध्ये प्रचंड चीड आहे. त्यामुळे सत्ता आणि पैशांचा बेमालूम वापर करूनदेखील विरोधकांच्या प्रचार सभांमधील खुर्च्या रिकाम्याच असतात. मात्र, मला ठिकठिकाणी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने मावळमध्ये विजयाची मशालच पेटेल असा विश्वास इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी व्यक्त केला. कळंबोली येथे संजोग वाघेरे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीकेची झोड उठवली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील, सतीश पाटील, भावना घाणेकर, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेकापचे सरचिटणीस गणेश कडू, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील,भरत पाटील, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख कल्पना पाटील, रेवती सकपाळ, दीपक घरत, शशिकांत डोंगरे, अनिल नाईक आदींसह महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवलेच नाही
पनवेल-उरण भागातील भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. नैना, जेएनपीटी, बीपीसीएल, सिडको, महानगरपालिका, अनियमित पाणीपुरवठा जैसे थे असून दहा वर्षे केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्यात आली आहे. या सर्व प्रकाराचा सत्ताधाऱ्यांना दणका बसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.