
पोलीस दलात किमान 30 वर्षे सेवा पुर्ण केलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकांचे (एएसआय) पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय ) होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. राज्य शासनाने पोलीस अंमलदार संवर्गामध्ये पदोन्नतीसाठी निर्णय घेतला होता. त्यानुसार पोलीस दलात 30 वर्षे कार्यरत राहून तीन वर्षे एएसआय म्हणून काम करणाऱ्या 170 जणांची पोलीस उपनिरीक्षकांना बढती देण्यात आली आहे. त्याशिवाय मार्च 2019 मध्ये शासनाच्या आदेशानुसार निवृत्त झालेल्या 152 पोलीस अंमलदारांना लाभ मंजूर करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार पोलीस आयुक्तालयातंर्गत सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी तीनही निकषांची पुर्तता करणाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. यासाठी काही दिवसांपुर्वी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. समितीने निकष पूर्ण करीत असलेल्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील १७० सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक संबोधण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. त्यामुळे संबंधितांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्नही पुर्ण झाले आहे.
पोलीस दलात 30 वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या 170 सहायक पोलीस उपनिरीक्षकांना पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आहे. – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर




























































