
वारजे माळवाडी परिसरात दहशत माजवून गुन्हेगारी करणाऱ्या सराईत रवींद्र ढोले टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. संबंधित टोळीविरुद्ध वेगवेगळ्या स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टोळीवर मोक्कानुसार केलेली ही 107वी कारवाई आहे.
रविंद्र वामन ढोले (30, टोळीप्रमुख रा. कर्वेनगर) प्रतीक प्रवीण दुसाने (29, रा. आनंदनगर, सिंहगड रोड) अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
सराईत ढोले आणि दुसाने यांनी सिंहगड रोड आणि वारजे भागात खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, जबरी चोरी, मालमत्तेचे नुकसान करणे, जखमी करणे, जीवे मारण्याची धमकी देण्याचे गुन्हे केले आहेत. त्यांच्याविरुद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या वतीने अपर आयुक्त राजेंद्र डहाळे यांना पाठविला. प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ढोले टोळीविरुद्ध मोक्का कारवाई केली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके, पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, उपनिरीक्षक मनोज बागल, सचिन कुदळे, अमोल भिसे, नितीन कातुर्डे, गोविंद कपाट, प्रियांका कोल्हे यांनी केली.
आतापर्यंत मोक्कानुसार 107 टोळ्या जेरबंद
सराईत टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत विविध भागांतील 107 टोळ्यांविरुद्ध मोक्कानुसार कारवाई केली आहे. त्यामुळे मध्यवर्ती शहरासह उपनगरांमध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली आहे. मागील 11 महिन्यांत तब्बल 44 टोळ्यांविरुद्ध मोक्कास्त्र उगारून कारवाईचा वेग कायम ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे.





























































