पुणे – मोबाईल शॉपी फोडून 25 महागडे मोबाईल चोरले, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील सुखसागरनगर मधील समर्थ मोबाईल शॉपीचे दूकान फोडून चोरट्यांनी वेगवेगळ्या कंपनीचे महागडे 25 मोबाईल व 19 हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि. 14) मध्यरात्री घडली. मोबाईल चोरी करताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून भारती विद्यापीठ पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

याबाबत प्रदीप दळवी (वय – 18, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री सुखसागरनगरमधील श्रीनाथ मेडीकलच्या बाजूला असलेल्या समर्थ मोबाईल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात घडली.

बुधवारी रात्री दळवी हे मोबाईल शॉपी बंद करून घरी गेले होते. यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल दुकानाचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर शॉपीमधील महागडे 25 मोबाईल व ड्रॉव्हरमधील 19 हजार 600 रुपयांची रोकड असा 1 लाख 94 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. मोबाईल चोरी करताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे पुढील तपास करीत आहेत.