
पुणे- जिल्ह्याताील कायदा सुव्यवस्था वठणीवर आणण्यासह अवैध धंद्याविरूद्ध पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार आता अवैध धंदा करणार्यांची यादी बनविण्यात आली असून त्यांच्याविरूद्ध ठोस कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः जुगार, मटका, दारूविक्रेत्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्याशिवाय औद्योगिक कंपन्यांमध्ये स्क्रॅपद्वारे काळा बाजार करणार्यांचीही कुंडली तयार करण्यात आली आहे. संबंधित सर्व पोलिस ठाण्यांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अवैध धंदा करणार्यांना लवकरच बस्तान गुंडाळावे लागणार आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर अवैध धंदेवाल्यांची कुंडली तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार, मटका चालविणारे, दारूविक्रेते, भाईगिरी-दादागिरी करीत स्थानकिांना मनस्ताप देणार्यांचा डेटा गोळा करण्यात येत आहे. त्याशिवाय ओढे-नदीकाठी अवैध वाळूउपसा करणार्यांची माहिती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नुकताच आढावा घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर गावोगावच्या नागरिकांना भयमुक्त वातावरणात राहता यावे, शालेय मुलींसह महाविद्यालयीन तरूणी, कामगार महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात अवैध धंद्याविरूद्ध मोठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे बेकायदेशीरमार्गाने संपत्ती गोळा करणार्यांचे धाबे दणाणले आहेत .
अवैध धंदे हद्दपार करणार, यादी तयार
जिल्ह्यातील अवैध धंदे करणार्यांविरूद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रमुखांना देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने संबंधितांची यादीही तयार करण्यात आली आहे. संबंधित ठाणे प्रमुखांसह स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा आराखडा तयार करून अॅक्शन घेण्यात येत आहे. त्यामुळे सराईत टोळ्यांसह अवैधरितीने माया गोळा करणार्यांची खैर केली जाणार नसल्याचा इशारा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी खेड शिवापूर कारवाईतून दिला आहे.
जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था मजबूत ठेउन अवैध धंद्याविरूद्ध मोहिम हाती घेण्यात आली आहे. विशेषतः जुगार, मटका, दारूविक्री, अवैध वाळूउपसा, औद्योगिक कंपन्यातील स्क्रॅपचा काळाबाजार करणार्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पोलीस ठाणे स्तरावर संबंधितांची यादी बनविण्यात आली आहे. त्याशिवाय नागरिकांनाही होणार्या त्रासाचीही दखल घेण्याचेही सूचित केले आहे.
अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण





























































