धायरीत कोयताधारक टोळीने केला अल्पवयीनावर वार, सिंहगड हद्दीत कोयत्याची दहशत कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागात कोयत्याच्या धाकाने लुटमार, मारहाणीच्या घटनांचा आलेख कायमस्वरूपी असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. भांडणाच्या रागातून टोळक्याने अल्पवयीनावार वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना 20 जानेवारीला रात्री आठच्या सुमारास सिंहगड ठाण्याच्या हद्दीतील धायरीत घडली. याप्रकरणी 17 वर्षीय मुलाने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन त्याचा भाउ रोशन आणि एकजण गप्पा मारत होते. त्यावेळी आलेल्या टोळक्याने अल्पवयीनाला एक महिन्यापुर्वी झालेल्या भांडणाचा जाब विचारला. त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने अल्पवयीनावर वार केला. त्यामुळे त्याच्या मनगटावर वार बसल्याने अल्पवयीन गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी हल्लेखोरांचा तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव यांनी दिली .

सिंहगड कॅम्पमध्ये घातला होता राडा

कोयता गँगने सिंहगड परिसरात दुकानांची तोडफोड करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी हल्लेखोराला दोघा अमलदारांनी ताब्यात घेतल्याची घटना ताजी आहे. असे असतानाच आता पुन्हा एकदा कोयता गँगने जुन्या वादातून अल्पवयीनावर वार केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.