हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते अखेर निलंबित

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याच्या वादग्रस्त तहसीलदार तृप्ती कोलते यांना आज अखेर निलंबित करण्यात आले. हडपसर मधील वन जमीन घोटाळा प्रकरणासह एकूण तीन प्रकरणांमध्ये दोशी धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

शासनाच्या महसूल विभागाचे आवर सचिव संजय राणे यांनी कोलते यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. फेब्रुवारी, मे व जून 2022 मध्ये केलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून ही कारवाई करण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या योग्य त्या परवानगी शिवाय राखीव असलेल्या वन विभागातील जमिन प्रदान केली असल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच कोरोनाच्या काळात देखील शासन निर्णयातील तरतुदीच्या विहित कार्यपद्धतीमध्ये काम न केल्याबाबत देखील दुसरी तक्रार करण्यात आली होती. बरोबरीने होऊ घातलेल्या निवडणुकीच्या कामकाजा संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. निलंबन काळामध्ये त्यांना जिल्ह्याचे मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी करून कारवाईचा अहवाल शासनाने मागितला आहे.