
पुणे शहरातील भवानी पेठ आणि इंदिरानगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे विनयभंग केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी खडक आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत भवानी पेठेत पीडित अल्पवयीन मुलगी (वय 14) गुरुवारी पहाटे परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहात जात असताना 47 वर्षीय आरोपीने तिचा रस्ता अडवला. मुलीचे आणि तिच्या मित्राचे एकत्र असलेले फोटो आरोपीने तिला दाखवले. ते फोटो तिच्या आई-वडिलांना आणि वस्तीतील लोकांना दाखविण्याची धमकी आरोपीने तिला दिली. त्यानंतर आरोपीने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. यातील पीडित मुलगी 11 वर्षांची असून आरोपी अल्पवयीन (वय 15) आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. मुलगी राहत्या घराच्या खिडकीजवळ खेळत होती. त्यावेळी आरोपी तेथे आला. ‘तुझी खेळणी खाली पडली आहे,’ असे आरोपीने मुलीला सांगितले. खेळणी घेण्यासाठी खाली आली असता आरोपी पीडित मुलीला घेऊन जवळच्या गार्डनमध्ये गेला. तेथे त्याने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस तपास करत आहेत.




























































