
पुणे शहरात रात्रंदिवस नागरिकांच्या सेवेसाठी काम करणाऱ्या पुणे पोलीस दलात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून दररोज 15 ते 20 पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दलात सध्या 200 कर्मचारी कोरोना संक्रमित असून ते विविध रुग्णालय तसेच काही घरी उपचार घेत आहेत.
नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि बीट मार्शलिंग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांमध्ये संक्रमणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. आत्तापर्यंत पोलिस दलातील 1935 जणांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यातील 1712 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पोलीस दलातील अनेकांना संसर्ग वेगाने होत असल्यामुळे काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आरोग्य विभागात काम करणाऱ्यानंतर सर्वाधिक ताण पोलिस यंत्रणेवर आहे. मागील वर्षीच्या पहिल्या लॉकडाऊन पासून पोलिस रस्त्यावर उतरुन काम करीत आहेत. नाकाबंदीत कागदपत्रांची पडताळणी करणे, दंडात्मक कारवाई करणे, विनामास्क भटकंती करणाऱ्यांविरुद्ध संपर्कात आल्यामुळे संक्रमनाचे प्रमाण वाढत आहे.
आता पुन्हा कोरोना संसर्गाने डोके वर काढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. शासनाने लागू केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरचे कामकाज असल्यामुळे पोलिसांचा थेट संपर्क नागरिकांसोबत येत आहे. परिणामी ड्युटीला असलेल्यांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. मागील काही महिन्यांत पोलिसांचे कोरोना संसर्ग प्रमाण तीन ते चारपर्यंत खाली आले होते. मात्र आता पुन्हा नव्याने संक्रमण वेगाने होत असल्यामुळे दिवसाला 15 ते 20 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रशासनासह कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.






























































