तोंडावर मास्क नसल्याने फसले, लॉकडाऊनच्या नाकाबंदीत दोन फरार गुन्हेगारांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कर्मचाऱ्याच्या डोक्यात डोक्यात बीअरची बाटली फोडून जखमी करून फरार झालेल्या सराईतासह आणखी एका गुन्हेगाराला पुणे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडले. प्रेम दशरथ कानडे (वय 25, रा. हिंगणे मळा हडपसर) आणि प्रफुल्ल संजय वाघमारे (वय 22, रा. कसबा पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांना संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास समर्थ पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विशाल मोहिते, हवालदार रणजित उबाळे, कर्मचारी प्रमोद जगताप, नीलेश साबळे, लक्ष्मी चौधरी, प्रियांका खराडे, स्मिता सिताप, नाकाबंदी कर्तव्यावर होते. त्यावेळी दोन व्यक्ती दुचाकीवर तोंडाला मास्क न लावता निघालेले त्यांना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी कर्मचारी नीलेश साबळे यांना संबंधित दुचाकीला नंबर प्लेट नसल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीत प्रफुल्ल वाघमारे समर्थ पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे साबळे यांना लक्षात आले. तर प्रेम कानडे बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे दुचाकीची चाैकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघां आरोपीवर विनामास्क फिरल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त डाॅ. प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते यांच्या पथकाने केली.