
चोरट्यांनी दोन इमारतीतील तब्बल 11 बंद फ्लॅट फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नाही. ही घटना 13 ते 14 जुलैदरम्यान वानवडीतील परमानगर को-ऑप सोसायटी आणि श्रद्धा रिझन्सी बिल्डीमध्ये घडली.
याप्रकरणी शैलेश बाफना ( वय 40 ) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैलेश यांचे परमारनगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत फेज तीनमध्ये फ्लॅट आहे. 13 जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शैलेश यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय अनिल शाह, रिहान शेख, रवींद्र दळवी, गिता जाम, जिल मंतेरे, फक्रुद्दीन पुरवाला, विजया जाधव यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांना ऐवज मिळाला नाही.
चोरट्यांनी दोन इमारतीतील बंद फ्लॅटमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इतरही ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना काहीही ऐवज मिळाला नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात आहे.
– अजय भोसले, पोलीस उपनिरीक्षक, वानवडी




























































