
दोन गटात झालेल्या वादानंतर एका गटाकडून कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या वडगाव शेरी भागात घडला आहे. या हाणामारीत तीन तरुण जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार घडला त्यावेळी एक महिला पोलीस तिथेच उपस्थित होती. आरोपी तरुण महिला पोलिसांसमोर पीडित तरुणांवर कोयत्याने वार करत होते. तसेच दगडाने मारहाण करत होते. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
वाद मिटवण्यासाठी गेलेले असता मित्राला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केलाप्रकरणी पाच आरोपींविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव शेरीतील आनंद पार्कच्या पवन सुपर मार्केटजवळील दिगंबर नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सौरभ संतोष पाडळे (रा. सोमनाथ नगर, वडगावशेरी) यांनी अनुज जितेंद्र यादव, ऋषिकेश टुनटुन चव्हाण (वय 18), आकाश भरत पवार (वय 23), अमोल वसंत घोरपडे (वय 30), अक्षय तापकीर, राहुल बारसे यांच्याविरुद्ध चंदन नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यापैकी अनुज, ऋषिकेश आणि आकाश हे तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यासह चोरपडे यांना अटक करण्यात आली आहे.



























































