
पुणे शहरातील कोयत्या गँगमध्ये सक्रिय आणि पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्नात असलेल्या दोघांच्या गुन्हे शाखा यूनिट सहाच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. तर, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून चार कोयते, दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आकाश मोहन कांबळे उर्फ राणा (22, रा. गंगानगर, हडपसर), सहिल मुक्तार शेख (20, रा. फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या कोयता टोळीतील दोघांची नावे आहेत.
शहरात कोयता गँगच्या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून गस्त वाढविण्यात आली असून गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात येत आहे. त्यानूसार युनिट सहाचे अधिकारी आणि अमंलदार हद्दीत पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान हडपसर परिसरातील गंगानगर येथील बांधकाम चालू असलेल्या पाण्याच्या टाकीमागे स्मशान भूमीजवळ कोयत्या गँगमधील चार ते पाच जण संशयीतरित्या थांबल्याची माहिती अंमलदार नितीन मुंडे यांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून राणा आणि शेख यांना अटक केली. तर, दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी कोयता गँगचा म्होरक्या बिट्या कुचेकर हा फरार झाला आहे. अटक आरोपींकडून चार कोयते, दोन फोन जप्त करण्यात आले असून आरोपी हे कोयता गँगला आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यूनिट सहाचे वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, अमंलदार कानिफनाथ कानखेले, रमेश मेमाणे, ऋषिकेश टिऴेकर, मच्छिंद्र वाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेला राणा हा कोयत्या गँगचा म्होरक्या कुचेकर याचा साथीदार आहे. गुन्हे करण्यासाठी अल्पवयीन मुलांची निवड करून त्यांना हत्यारे पुरविण्याचे काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
– रजनिश निर्मल, पोलीस निरीक्षक, यूनिट सहा



























































