पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे कृषी सुधारणा अध्यादेशांविरोधात ‘रेल रोको’ आंदोलन

पंजाबमधील शेतकरी संघटनांनी केंद्राच्या तीन कृषी सुधारणा अध्यादेशांविरोधातील आपल्या तीन दिवसांच्या ’रेल रोको’ आंदोलनाला आजपासून सुरुवात केली. पहिल्याच दिवसापासून या आंदोलनाचे मोठे परिणाम रेल्वे सेवेवर झाल्याचे दिसत आहे. अमृतसर आणि फिरोझपूर या पंजाबमधील प्रमुख स्थानकांसह अनेक स्थानकांवर शेतकरी आंदोलकांनी रेल्वे रुळांवर ठाण मांडत वाहतूक बंद पाडली.त्यामुळे रेल्वे खात्याला 14 विशेष एक्सप्रेस आणि मेल काही काळासाठी रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने प्रकाशांच्या आणि रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी काही विशेष रेल्वे गाडय़ा 26 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय किसान युनियनच्या सदस्यांनी आंदोलनाला सुरुवात करताना संगरूर आणि बर्नाला स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर ठाण मांडले.अनेक निदर्शक थेट रुळांमध्ये झोपले. किसान मजदूर संघर्ष समितीच्या सदस्यांनी अमृतसरच्या देविदासपूर आणि फिरोझपूरच्या बस्ती टंका स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर ठिय्या मांडला.

मोदी हे शेतकऱयांचे देव
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱयांचे देव आहेत, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. संसदेने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट होईल असा दावा करतानाच, या विधेयकांना विरोध करणारे ‘किसानद्रोही’ आहेत असेही चौहान म्हणाले. ही विधेयके म्हणजे शेतकऱयांच्या देवाचा आशीर्वाद आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

राजकीय नेत्यांनी आंदोलनापासून दूर राहावे – आयोजकांचे आवाहन

शेतकऱयांच्या तीन दिवसीय रेल रोको आंदोलांपासून राजकीय नेते, खासदार, आमदार, मंत्री आणि सर्वच राजकीय पक्षांनी दूर राहावे, कारण हे शेतकऱयांचे स्वतंत्र आंदोलन आहे असे आवाहन किसान मजदूर संघर्ष समितीचे अध्यक्ष सतनाम सिंग पन्नू यांनी केले आहे. वादग्रस्त कृषी सुधारणा अध्यादेशांना पाठिंबा देणारे राजकीय नेते आणि भाजपच्या नेत्यांना येत्या दोन दिवसांत घेराव घालण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या नेत्यांवर शेतकरी सामाजिक बहिष्कारही घालणार आहेत. शेतकरी या अध्यादेशांविरोधात का संघर्ष करीत आहेत, ते या नेत्यांना आम्ही सांगणार आहोत असे पन्नू म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या