शस्त्रक्रिया करताना मुस्लिम रुग्णांची दाढी करू नका! समाजवादी पक्षाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

एका बाजूला तीन तलाकमुळे देशात वातावरण तापलेले असताना समाजवादी पक्षाने वेगळीच मागणी करून पालिकेत धार्मिक वाद निर्माण केला आहे. पालिकेच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करताना मुस्लिम रुग्णांची दाढी काढू नका किंवा दाढी काढायचीच असेल तर नातेवाईकांची परवानगी घ्यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला लिहिले आहे.

स्वतः अजिबात दाढी न ठेवणाऱ्या रईस शेख यांनी दाढीवरून राजकारण सुरू केले आहे. मुस्लीम समाजात दाढीला खूप महत्त्व असून या धर्मातील सर्वच पुरुष व धर्मगुरू दाढी ठेवतात. दाढी ठेवणे ही मुस्लिम समाजाची धार्मिक परंपरा आहे. परंतु पालिकेच्या रुग्णालयांत रुग्णावर छोटीशी शस्त्रक्रिया करायची असेल तरी रुग्णाच्या चेहऱ्यावरचे संपूर्ण केस काढण्यात येतात. दाढी काढणे हे मुस्लीम समाजाच्या विरोधात आहे. त्यामुळे अशा रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना समाजात वावरताना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना आवश्यक असेल तरच दाढी काढण्यात यावी अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे. रईस शेख यांनी मुस्लिम धर्माच्या काही प्रतिनिधींसमवेत आज आरोग्य विभागाचे उपायुक्त सुनील धामणे यांची भेट घेतली व त्यांना पत्र दिले आहे. तसेच यावर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणीही केली आहे.