
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा अहमदाबादेतील नेटमध्ये गोलंदाजी करतानाच फोटो बीसीसीआयने व्हायरल केला आहे. या फोटोमुळे क्रिकेटविश्वास तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या फोटोचे औचित्य बोर्डाने स्पष्ट केल्यावर चर्चांना पूर्णविराम मिळाला. टीम इंडियाचे गोलंदाज चांगली कामगिरी करत असताना द्रविड यांनी प्रॅक्टिस नेटमध्ये गोलंदाजी करण्याचे कारण काय, असा प्रश्न सर्वांना पडला होता.
हिंदुस्थानी फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या एका डावात 10 गडी बाद करण्याच्या विश्वविक्रमाला 7 फेब्रुवारीला 23 वर्षे पूर्ण झाली. आपला सहकारी कुंबळेच्या या विक्रमाला सॅल्यूट म्हणून द्रविड यांनी नेटमध्ये काही वेळ गोलंदाजी केली.बोर्डाने आपल्या साईट्सवर त्यांचे हे छायाचित्र प्रसिद्ध केल्यावर चर्चांना उधाण आले होते.
हिंदुस्थानी गोलंदाज मैदानात चांगली कामगिरी करत नाहीत किंवा ते अनफिट आहेत, असे कोणतेही कारण द्रविड यांनी नेटमध्ये गोलंदाजी करण्यामागे नाही. टीम इंडियाच्या युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी पहिल्याच वनडे सामन्यात वेस्ट इंडिजला लोटांगण घालायला भाग पाडले होते. या सामन्यात चहलने चार तर सुंदरने तीन विकेट्स मिळवल्या होत्या. या दोघांना प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांनी सुरेख साथ दिली होती.
अहमदाबादमध्ये हिंदुस्थानी संघ दुसऱ्या वनडेसाठी सराव करत होता. त्याचवेळी द्रविड नेटमध्ये गोलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. बीसीसीआयने याबाबतचे कारण स्पष्ट केले. बीसीसीआयने यावेळी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये बीसीसीआयने राहुल द्रविड गोलंदाजी करत असल्याचे फोटो पोस्ट केले आहेत. ही पोस्ट करताना बीसीसीआयने अनिल कुंबळेच्या विश्वविक्रमाला 23 वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले आहे. कुंबळेने 7 फेब्रुवारीला तब्बल 23 वर्षांपूर्वी एकाच डावात तब्बल 10 बळी मिळवण्याचा पराक्रम केला होता. 7 फेब्रुवारी 1999 या दिवशी पाकिस्तानचा संघ चौथ्या डावात फलंदाजी करत होता. त्यावेळी कुंबळेने पाकिस्तानच्या 10 विकेट्स मिळवल्या होत्या, अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा व हिंदुस्थानचा पहिलाच गोलंदाज ठरला होता. त्यामुळे कुंबळेच्या विक्रमाला सलाम करावा, यासाठी द्रविडने नेट्समध्ये गोलंदाजी केली. कुंबळे आणि द्रविड हे एकाचवेळी हिंदुस्थानी संघात होते, त्याचबरोबर ते एकाच राज्यातून खेळत होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये दृढ मैत्री आहे.



























































