
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘राफेल’ घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला सुरूच ठेवला आहे. ‘पंतप्रधान मोदींची लोकसभेत राफेलवर परीक्षा आहे. त्यासाठी 1, 2 आणि 4 क्रमांकाचे प्रश्न आपण देत आहोत’ असे सुरुवातीला ट्विट राहुल गांधींनी केले. त्यावर मोदीभक्तांनी ट्रोल करीत राहुल यांच्यावर टीकेचा भडिमार केला, मात्र राहुल यांनी 3 क्रमांकाचा प्रश्न अचानक ट्विट करीत गुगली टाकली आणि भक्तांनाच ‘पप्पू’ बनविले.
काल लोकसभेत राफेल प्रकरणावर जोरदार हल्ला चढविल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मोदींना चर्चेचे आव्हान दिले होते. राहुल यांनी त्यानंतर ट्विट करीत मोदींना तीन प्रश्न विचारले. मोदींची उद्या लोकसभेत परीक्षा आहे. त्यासाठी ऍडव्हान्समध्ये हे तीन प्रश्न घ्या असे राहुल गांधींनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले.
हे 1, 2, 4 प्रश्न
1. हवाई दलास 126 राफेल विमानांची गरज असताना 36 विमाने कशासाठी?
2. राफेलच्या विमानाची किंमत 560 कोटी असताना 1600 कोटी कशासाठी?
4. ‘एचएएल’ऐवजी ‘एए’ का?
राहुल गांधींनी आधीच्या ट्विटमध्ये ‘प्रश्न क्रमांक 3’ दिलेला नव्हता. त्यावर भक्तांकडून त्यांना ट्रोल करीत दिवसभर पप्पू म्हणत टिंगल केली. भक्तांकडून टीका सुरू असतानाच अचानक राहुल गांधींनी ‘प्रश्न क्रमांक 3’ ट्विट केला आणि भक्तांची चांगलीच फजिती झाली.
पॉप्युलर डिमांडनुसार प्रश्न क्रमांक 3
सभापती मॅडम यांनी गोव्याच्या टेपबद्दल बोलायचे नाही असे सांगितले असल्याने आपण ‘प्रश्न क्रमांक 3’ मागे ठेवला होता, पण ‘प्रश्न 3’ फारच पॉप्युलर डिमांडचा बनलेला दिसत आहे अशी टोलेबाजी करीत राहुल गांधींनी ‘प्रश्न क्रमांक 3’ ट्विट केला आणि भक्तांची हवाच गेली.
क्रमांक 3 : मोदीजी, कृपया सांगा, पर्रीकरजी यांनी राफेलच्या फायली बेडरूममध्ये का ठेवल्या आहेत आणि त्यात काय आहे?






























































