
देशातील गरिबाच्या खिशातून पैसे काढायचे आणि ते काही अब्जाधीशांच्या खात्यात ट्रान्सफर करायचे, असे काम गेले 8 वर्षे सत्तेत असलेली भाजप करत आहे. नोटांबदी, जीएसटी तसेच कोरोनातील संशयित घडामोडी या सगळ्या घटना हा सर्व मनी ट्रान्स्फरचा खेळ आहे. मोदी गरिबांच्या खिशातील पैसे काढून उद्योगपतींचे खिसे भरत आहेत. मोदी सरकार देश चालवत नाही तर ते अशा प्रकारे मनी ट्रान्स्फर स्कीम चालवत आहेत, असा घणाघात आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज भारत जोडो यात्रेदरम्यान केला.
भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशमध्ये असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पदयात्रेदरम्यान विविध क्षेत्रातील लोकांची, कार्यकर्त्यांची भेट घेत वातावरणात अधिक उत्साह वाढवला. यावेळी झालेल्या रॅलीत मोदी आणि भाजपवर त्यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, यूपीए सरकारच्या काळात गॅस, पेट्रोलच्या किमती आटोक्यात होत्या. मात्र, आता त्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. पैसे गायब होत नाही, पैसे ट्रान्स्फर होतात, असे सांगत मोदी सरकार गरीबांच्या खिशातले पैसे दुसऱयाच्या खिशात टाकत आहेत. नंतर हेच पैसे भाजपकडे जातात. भाजपच्या खासदार, आमदारांकडे जातात. त्याचा वापर भाजपविरोधी सरकार पाडण्यासाठी केला जात आहे. तुम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्या लोकप्रतिनिधींना खरेदी करण्यासाठी या पैशाचा वापर केला जात आहे. हा भ्रष्टाचार नाही तर आणखी काय आहे, असा सवालही राहुल गांधी यांनी केला.




























































