
भक्ष्याला पाहून झेपावलेला बिबटय़ा वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. राहुरी फॅक्टरी-देवळाली मार्गालगत रविवारी पहाटे हा बिबटय़ा पिंजऱ्यात अडकला.
आठवडाभरापूर्वी या भागात बिबटय़ाचे दर्शन झाल्याने पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन राहुरी वन विभाग प्रशासनाकडून मुसमाडे यांच्या शेती गट नंबर 452मध्ये पिंजरा लावण्यात आला होता. रविवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात आलेल्या दोन वर्षांच्या नर बिबटय़ाची नजर पिंजऱ्यात ठेवलेल्या भक्ष्यावर गेल्याने बिबटय़ाने झेप घेतली. मात्र, तो पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबटय़ाच्या डरकाळ्या ऐकून शेतकऱ्यांनी पिंजऱ्याच्या दिशेने धाव घेतली असता, बिबटय़ा पिंजऱ्यात अडकल्याचे दिसले. शेतकऱ्यांनी या घटनेची खबर वन विभागाला दिली. वनक्षेत्रपाल पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भगवानसिंह परदेशी, वनरक्षक पवन निकम, वन कर्मचारी गोरक्षनाथ मोरे, भाऊसाहेब गाढे, रामदास धनवटे यांनी घटनास्थळी जाऊन पिंजऱयात जेरबंद झालेल्या बिबटय़ाला डिग्रस नर्सरीत हलविले.
संगमनेरात युवतीवर बिबटय़ाचा हल्ला
तालुक्यातल्या निमगाव टेंबी येथे राहत असलेल्या ऋतुजा बाबासाहेब मोदड (18) या युवतीवर बिबटय़ाने हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर संगमनेरच्या खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. ऋतुजा रात्रीच्या वेळी घरातून बाहेर आली असता, अचानक बिबटय़ाने तिच्यावर हल्ला केला. तिला ओढून नेले. मात्र, तिने जोरजोराने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. तोपर्यंत बिबटय़ाने धूम ठोकली. वन विभागाने दोन पिंजरे लावल्याची माहिती वनरक्षक सी. डी. कासार यांनी दिली आहे.



























































