
सामना प्रतिनिधी, मुंबई
रेल्वेच्या हद्दीत दारू पिण्यास परवानगी द्यायची पण कशी यावरून आयआरसीटीसीच्या अधिकारीवर्गाची कायद्याला बगल देण्याची तयारी सुरू आहे. स्थानकाच्या 18 नंबर फलाटाच्या शेजारी उभारण्यात येणाऱ्या अभिनव अशा ‘कोच रेस्टॉरंट’मध्ये येणाऱ्या पर्यटकांना आरामात मद्याचा आस्वाद घेता यावा यासाठी रेल्वे आता आपल्या धोरणातच बदल करण्याच्या तयारीत आहे.
मध्य रेल्वेने वाफेच्या जुन्या इंजिनासह इतर अनेक हेरिटेज वस्तू रेल्वेच्या चाहत्यांना पाहता याव्यात यासाठी अलीकडेच येथे ‘हेरिटेज गल्ली’ नावाने खुले संग्रहालय उभे राहत आहे. तेथे येणाऱ्या पर्यटकांच्या करमणुकीसाठी आयआरसीटीसीच्या मदतीने रेल्वेच्या एका जुन्या बोगीत अनोखे रेस्टॉरंट उघडले जाणार आहे. सीएसएमटी स्थानकाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ लांबपल्ल्याचा फलाट क्र.18 जवळ असलेल्या या मोकळ्या जागेत हे हेरिटेज थीमवर आधारित रेस्टॉरंट उघडले जाणार आहे. यासाठी रेल्वेची खानपान सेवा सांभाळणाऱ्या आयआरसीटीसीकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ट्रेनच्या एका थ्री एसी कोचमध्ये रेस्टॉरंट उभारण्याची संकल्पना आहे. आत आणि बाहेर एकूण 60 जणांना बसता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. किचनसाठी पॅण्ट्रीकार आणि पर्यटकांना कोचमध्ये बसण्याची व्यवस्था अशी काहीशी अभिनव रेस्टॉरंटची रचना असणार आहे.
लोहानी यांची मूळ संकल्पना
सध्या रेल्वे बोर्डाचे चेअरमन असलेले अश्विनी लोहानी हे मध्य प्रदेश पर्यटन महामंडळाचे प्रमुख असताना त्यांनी पर्यटन वाढून त्यातून सरकारी तिजोरी भरण्यासाठी अशा प्रकारच्या रेल्वे भोगीच्या रेस्टॉरंटची संकल्पना प्रथम मांडली होती. आता त्यावर पावले टाकली जात आहेत.
रेल्वेच्या परिसरात मद्यपानास मनाई
रेल्वेच्या डेक्कन ओडिसी, पॅलेस ऑन व्हील्स तसेच महाराजा एक्स्प्रेससारख्या गाड्यांमध्ये विदेशी पर्यटकांना मद्य प्राशनाची परवानगी आहे, मात्र रेल्वे स्थानकाच्या परिसरात अद्याप मद्यपानाची परवानगी देण्यात आलेली नाही.

























































