
मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई शहर व उपनगरांत रविवारी सकाळी चालू हंगामातील चांगल्या पावसाची हजेरी लागली. जवळपास 15 ते 20 मिनिटांच्या दमदार हजेरीने हवेत काही काळ गारवा निर्माण झाला. मात्र पुढच्या काही वेळेतच कडक ऊन पडले आणि पुन्हा उष्ण वातावरण तयार झाले. त्यामुळे ‘आला पाऊस, गेला पाऊस’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया मुंबईकरांच्या तोंडून बाहेर पडली. याचदरम्यान हवामान खात्याने मान्सून सक्रिय झाल्याची खूशखबर देत मुंबईसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला.



























































