
विजय जोशी । नांदेड
देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, सर्वसामान्य जनता भयभित झाली आहे, गेल्या अनेक वर्षात जी परिस्थिती बिघतली नव्हती त्यापेक्षाही भयानक प्रकार या देशात होत असून, लोकांची फसवणूक करुन सत्ता मिळविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता जागा दाखवायची वेळ आली असून, येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसला निवडून देवून काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करणाऱ्यांना हिसका दाखवयाचा आहे, असे प्रतिपादन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी येथे केले. नवामोंढा मैदानावर राजस्थानचे मुख्यमंत्री हे पहिल्यांदा महाराष्ट्रात आल्याने त्यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
लोकांना खोटी आश्वासने देवून सत्ता मिळविलेल्या भाजपाने जनतेची घोर फसवणूक केली आहे. काळा पैसा परत आणू, जनतेच्या खात्यात 15 लाख रुपये टाकू, देशातील महागाई कमी करु, बेरोजगारांना, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवू अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारुन सत्ता हस्तगत केली, मात्र यातील एकही आश्वासन पूर्ण न करता या देशात भितीचे वातावरण निर्माण केले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढत्या प्रमाणात बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव न मिळणे, जाती जातीत तणाव निर्माण करणे यामुळे जनता आता चिडली आहे. त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पहायला मिळाला. आता येणाऱ्या लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीत देखील जनता पुन्हा एकदा काँग्रेसला विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राफेल घोटाळ्याच्या मुद्यावरुन मोदी सरकार वारंवार खोटे बोलत आहे. टेंडर न काढता राफेलची खरेदी झाली. त्याची किंमती कुणी वाढवली हा साधा प्रश्न, मात्र त्याचे उत्तर त्यांना देता येत नाही, उलट राहूल गांधींवर वाटेल तसे आरोप करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे ते आता जनतेने ओळखले आहे. काँग्रेसमुक्त करायला निघालेल्या भाजपाला आता सत्ता सोडावीच लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





























































