अंधश्रद्धेचा कहर! तरुणाने स्वतःचं गुप्तांग कापून संडासात फ्लश केलं

अंधश्रद्धा ही अतिशय घातक असते, त्यामुळे तिला बळी पडू नका असं आवाहन वेगवेगळ्या माध्यमातून आजवर करण्यात आलं आहे. पण, त्याला बळी पडणारी माणसं आपलं नुकसान करून घेतातच. असाच एक गंभीर प्रकार राजस्थानच्या सीकर येथे झाला आहे. येथील एका तरुणाने तांत्रिक विद्येच्या प्रभावाखाली स्वतःचं गुप्तांग कापून फेकून दिलं आहे.

सीकर जिल्ह्यातील फतेहपूर येथे राहणाऱ्या या तरुणाला तांत्रिक विद्या शिकण्याची इच्छा होती. त्या प्रभावाखालीच तो वावरत होता. घटनेच्या दिवशी तो घरच्या संडासात गेला. त्याने तिथे आपलं गुप्तांग कापलं. त्या दुखापतीमुळे तो विव्हळून ओरडला. त्यामुळे त्याचे कुटुंबीय संडासाबाहेर जमा झाले. त्यांनी दरवाजा ढकलून आत प्रवेश केला तेव्हा सर्वत्र रक्ताचं थारोळं माजलं होतं. तोपर्यंत त्याने आपलं गुप्तांग कापून संडासात फ्लश केलं होतं.

या प्रकारामुळे घाबरलेल्या त्याच्या कुटुंबाने त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं. तिथून त्याला पुढील उपचारांसाठी जयपूर येथे नेण्यात आलं आहे. हा तरुण विवाहित असून आपल्या कुटुंबासोबतच राहतो. तरीही त्याने अशी स्वतःला दुखापत केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.