कर्करोग प्रतिबंधासाठी टाटा रुग्णालयाने रोड मॅप तयार करावा! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कर्करोग प्रतिबंधासाठी मार्गदर्शक असा रोड मॅप टाटा रुग्णालयाने तयार करावा. संभाजीनगर येथील कॅन्सररुग्णालयावरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी जालना येथे टाटा रुग्णालयाचे क्षेत्रीय केंद्र (स्पोक) तयार करावे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

कर्करोग निदान केंद्र स्थापन करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आरोग्यमंत्री टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य विभागामार्फत कर्करोग निदान आणि उपचारासाठी  प्रयत्न केले जात असतानाच या आजाराच्या प्रतिबंधासाठी टाटा रुग्णालयाने रोड मॅप करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. कर्करुग्णांच्या संख्येत वाढ होत असून या रोगाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजे, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी  यावेळी सांगितले.

टाटा रुग्णालयाच्या संकल्पनेनुसार श्रेणी दोन अथवा तीन दर्जाचे क्षेत्रिय केंद्र जालना येथे तयार करण्यात यावे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या क्षेत्रिय केंद्रामध्ये तपासणी, निदान, रेडीएशन, केमोथेरपीची सुविधा उपलब्ध असेल, असेही आरोग्यमंत्री यांनी सांगितले. यावेळी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती केरेकट्टा, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. साधना तायडे, टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, डॉ. बाणावली, डॉ. कैलास शर्मा, डॉ. पंकज चर्तुर्वेदी, डॉ. पिंपळे आदी उपस्थित होते.