संसद परिसरात ‘त्या’ चहावरून चर्चा, सत्ताधारी-विरोधी वातावरण तापलेलेच

tea-harivansh

संसदेत सध्या शेतकरी विधेयकाच्या मंजूरीवरून वातावरण तापलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आपल्या मुद्द्यावर कायम असून आता आंदोलनाला आंदोलनाने उत्तर देण्यात येत आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा राजकीय चहाला उकळी मिळाली. कारण उपसभापती आंदोलन करणाऱ्या विरोधी खासदारांसाठी चहा घेऊन गेले आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून त्यांचे कौतुक केले. यामुळे पुन्हा एकदा चहाची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यसभेत शेतकरी विधेयकासाठी मतदान घेण्याची मागणी विरोधकांनी केलेली मागणी फेटाळल्याने गोंधळ झाला. विरोधी पक्षाच्या आठ गोंधळी खासदारांचे निलंबन करण्यात आले. या विरोधात हे खासदार संसदेच्या परिसरात रात्रभर धरणे आंदोलनासाठी बसले. त्यानंतर आज सकाळी उपसभापती हरिवंश हे स्वत: या खासदारांसाठी चहा घेऊन गेले. आणि त्यांनी देखील विरोधकांच्या राज्यसभेतील वर्तना विरोधात 24 तास उपवास ठेवणार असल्याचे सांगितेल. त्यामुळे आता आंदोलनाला आंदोलनानेच उत्तर देण्यात येत आहे.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट आले. यामध्ये त्यांनी उपसभापती हरिवंश यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, ‘ हरिवंशजींचा अपमान करणाऱ्या आणि आंदोलनास बसलेल्या खासदारांना चहा देण्यासाठी ते स्वत: पोहोचले आहेत. हे त्यांचे मोठेपण आहे. संपूर्ण देशासह मी देखील त्यांचे अभिनंदन करतो.’

पंतप्रधान मोदींनी केलेल्या ट्विटवरून पुन्हा एकदा ‘चहा’ चर्चेत आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या