सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचे शीर धडावेगळे करणाऱ्याला 21 लाखांचे बक्षिस, अयोध्येतील महंतांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांचे शीर धडावेगळे करणाऱ्याला 21 लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. अयोध्येतील हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनी ही घोषणा केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये गोस्वामी तुलसीदास लिखित रामचरितमानसवरून (Ramcharitmanas) घमासान सुरू आहे. याच दरम्यान रविवारी भारतीय ओबीसी महासभेद्वारे लखनौमध्ये रामचरितमानसच्या प्रती जाळण्यात आल्या. यामागे स्वामी प्रसाद मौर्य यांचा हात असल्याचा आरोप राजू दास यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

रामचरितमानसमध्ये लिखित एका चौपाईवरून वादाला सुरुवात झाली आहे. शूद्र हे अधम जातीचे आहेत. ब्राह्मण दुराचारी, निरक्षर असला तरीही तो ब्राह्मण आहे आणि त्यामुळे तो पूजनीय आहे. मात्र शूद्र हा किती ज्ञानी, विद्वान असला तरीही त्याचा सन्मान करू नका, असा यातील एका चौपाईचा अर्थ असल्याचा दावा स्वामी प्रसाद मौर्य यांनी केला आहे.

धर्माचा सन्मान, पण….

तुलसीदास यांचे जर वरीलप्रमाणे म्हणणे असेल तर मी अशा धर्माला नमस्कार करतो आणि ही आशा बाळगतो की या धर्माचा सत्यानाश होईल कारण हा धर्म आमचा सत्यानाश करू पाहतो आहे, असेही मौर्य पुढे म्हणाले. तसेच धर्म कुठलाही असो आम्ही त्या धर्माचा सन्मानच करतो. मात्र धर्माच्या नावावर विशिष्ट जात आणि विशिष्ट धर्माच्या लोकांना अपमानित करण्यात आले आहे. आमचा आक्षेप हा याच गोष्टीवर आहे, असेही ते म्हणाले. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.