
इंधनाचे दर अमेरिका ठरवते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरून केंद्र सरकारला दोषी ठरवणं चुकीचं असल्याचं अजब तर्कट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मांडलं आहे.
केंद्र सरकारने दिवाळीत पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली असली तरी इंधन दरवाढीवरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री दानवे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकार रोज किमती खालीवर करत नाही. पेट्रोलचे दर अमेरिका ठरवते. त्यामुळं इंधन दरवाढीचा केंद्र सरकारला दोष देणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. इंधनाच्या वाढत्या दरांवर यांनी मोर्चे काढले. पण काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमती जागतिक बाजारपेठेशी जोडल्या आहेत. केंद्राने इंधनावरील कर कमी केला आहे. मात्र काँग्रेसची सत्ता असणारी राज्ये आणि विरोधी पक्षांची सत्ता असणारी राज्ये कर कपात करण्यास तयार नाहीत. देशातील कारभार हा केंद्र सरकारने दिलेल्या निधीवर चाललाय. हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे, असं दानवे म्हणाले.



























































