मिस्त्री कुटुंबाला टाटांची नवी ऑफर, हिस्सेदारी खरेदी करण्याचा प्रस्ताव न्यायालयात सादर

टाटा समूह आणि सायरस मिस्त्री यांच्यात सध्या न्यायालयीन लढाई सुरु असतानाच मिस्त्री कुटुंब सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. ही अडचण दूर करण्यासाठी टाटा समूहाकडून मिस्त्री कुटुंबाला एक नवी ऑफर देण्यात आली आहे. या नव्या प्रस्तावानुसार टाटा समूहाने मिस्त्री कुटुंबियाकडील हिस्सेदारी खरेदी करण्याचा प्रस्ताव न्यायालयात सादर केला आहे. या प्रस्तावास मिस्त्री समूहाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद दर्शविण्यात आलेला नाही.

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री आणि टाटा समूह यांच्यात न्यायालयीन लढाई सुरु आहे. ही लढाई सुरु असतानाच मिस्त्री कुटुंबियांचे शापूरजी पालोनजी समूहावरील कर्ज वाढल्याने ते फेडण्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या टाटा समूहाचे शेअर गहाण ठेवण्याची मागणी न्यायालयात केली आहे.

टाटा समूहाचे शेअर गहाण ठेवल्यास ते इतर गुंतवणुकदारांच्या हाती जातील, जे लोक भविष्यात टाटा समूहाला हानी पोहचवू शकतील, त्यामुळे ही हिस्सेदारी गहाण ठेवणे समूहासाठी जोखमीचे असेल, असा युक्तीावाद यावेळी टाटा समूहाच्या वकिलाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, मिस्त्री कुटुंबियांनी पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्याकडील शेअर्स विक्री अथवा गहाण ठेवू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

28 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

2016 मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली होती. या निर्णयाला सायरस मिस्त्री यांनी कंपनी कायदा लवाद आणि न्यायालयात आव्हान दिले होते. गेल्या चार वर्षांपासून हा खटला सुरु असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 28 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या