कोरोना अहवाल आता थेट मोबाईलवर मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना बाबत करण्यात आलेल्या आरटी-पीसीआर तपासणी बाबत असणारा अहवाल आता तपासणी करणार्‍या व्यक्तीला थेट त्याच्या मोबाईल वर एका लिंक द्वारे मिळणार आहे. कोविड तपासणी अहवाल घेण्याकरिता होणारी गर्दी कमी करण्यासाठी रत्नागिरीतील जिल्हा कोव्हीड रुग्णालयातर्फे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

कोविड रूग्णालयाने एक सॉफ्टवेअर विकसित केले असून तपासणीच्या वेळी येणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक याठिकाणी नोंदवून घेतला जातो. चाचणीचा निकाल येताच संबंधित मोबाईल वर एक लिंक पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह हे आता तपासणी करणार्‍या व्यक्तीला घरबसल्या कळू शकणार आहे.

जिल्हा कोव्हीड रुग्णालयातील डॉक्टर अर्जुन सुतार यांनी ही अद्यावत व्यवस्था आज उपलब्ध करून दिली आहे. हा अहवाल रुग्णाला कसा प्राप्त होईल तसा त्याच वेळी तो आयसीएमआरला पाठवण्याची यात व्यवस्था आहे. सदर अहवाल पीडीएफ स्वरूपात असणार असून याची प्रिंट देखील संबंधित व्यक्तीला सोबत काढून ठेवता येणे शक्य होईल.