
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई या संस्थेचा हीरक महोत्सव विलेपार्लेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच माजी राज्यमंत्री, आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते हीरक महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज संस्था ज्या उद्देशाने स्थापन करण्यात आली आहे तो वारसा संस्थेचे पदाधिकारी योग्यपणे चालवत असल्याचे आमदार रवींद्र वायकर यांनी सांगत विद्यमान अध्यक्ष श्रीकृष्ण विचारे, कार्याध्यक्ष मोतीराम विश्वासराव, उपकार्याध्यक्ष जनार्दन विश्वासराव व सहदेव सावंत, सरचिटणीस जितेंद्र पवार, खजिनदार मंगेश पंडित, चिटणीस सुरक्षा घोसाळकर व यशवंत साटम, सहखजिनदार प्रशांत कदम यांचे काwतुक केले. यावेळी सिनेअभिनेते सुशांत शेलार, ‘कोकण भूषण’ पुरस्कारप्राप्त आबासाहेब सावंत व माजी नगरसेवक बाळा नर उपस्थित होते. अभिनेता सुशांत शेलार यांनी सांस्कृतिक कार्यक्रस सादर केलेल्या सर्व विद्यार्थी बाल कलाकारांचे कौतुक केले. कोकणातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणार आहे असे सांगितले. उपकार्याध्यक्ष व आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलचे चेअरमन सहदेव सावंत यांनी संस्था चालवित असलेल्या बालविकास विद्या मंदिर व आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल या शाळांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाला पहिल्या मुख्याध्यापिका सुधा दामले, शिवसेना विभागप्रमुख विश्वनाथ सावंत, मराठी उद्योग समाजाचे अध्यक्ष सुहास तावडे, सुरक्षा घोसाळकर, सरचिटणीस जितेंद्र पवार उपस्थित होते.


























































